लायगुडे हॉस्पिटल मधील स्वॅब सेंटर बंद करण्यात आहे ते तातडीने चालू करावे- दिपाली प्रदीप धुमाळ
सिंहगड रोड, वडगाव खुर्द येथील मनपाच्या स्व. मुरलीधर पांडुरंग लायगुडे रुग्णालयातील कोविडच्या तपासण्या बंद करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर तेथील ऑक्सिजन बेडचे काम थांबविण्यात आले आहे. रुग्णांचे स्थलांतर, विलगीकरण, आयसोलेशन देखील बंद केले आहे. कोरोनाच्या सुरवातीपासून लायगुडे रुग्णालयात असलेली यंत्रणा बंद करणे हि बाब अनाकलनीय आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने चालवून त्यात वाढ करणे गरजेचे असताना, तसेच या रुग्णालयासाठी करोडो रुपये खर्च करून सर्व बाबी बंद करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.
आता धायरी-वडगाव येथील कोरोना बाधित रुग्णांना स्वॅब घेण्यासाठी पु. ल. देशपांडे उद्यान येथे जावे लागणार आहे. लायगुडे रुग्णालय हि इमारत बांधून तयार असताना पु. ल. देशपांडे उद्यानात मांडव टाकून सेंटर तयार केले आहे. अशा तऱ्हेने विनाकारण पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी चालू आहे. मनपाने बांधलेल्या मिळकती बंद करून मांडव टाकून सेंटर उभारणे हि बाब आर्थिक दिवाळखोरीकडे नेणारी आहे. आज या रुग्णालयाची पहाणी राष्ट्रवादी महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ यांनी व संबंधित विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत केली.
हा परिसर शहरालगत असून झपाट्याने वाढत आहे. या हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलर बेड्स व अन्य आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा सुरु करण्याची गरज आहे तरी अश्या परिस्थितीमध्ये रुग्णालयाच्या इमारतीमधील खोल्यात अद्यावत असे हॉस्पिटल सुरु करावे तसेच त्याच बरोबर जे स्वॅब सेंटर बंद करण्यात आहे ते तातडीने चालू करावे अशी मागणी विरोधी पक्षनेत्या - दिपाली प्रदीप धुमाळ, पुणे मनपा यांनी केली आहे.